अवघ्या ताफ्याच सूर
आज काहीसा बेसूर
जो तो लढतो आहे
नाही कुणाचा कसूर
पोटाचा करुन भाता
भिमा फुंकतो पिपाणी
पोटातल्या जाळावरती
घालतो डोळ्यातले पाणी
जीव खाउन नामा
बडवतो आहे ताशा
चार महीने भाडे थकले
उद्या गुंडालावा गाशा
दोन्ही बाजूने मार खातो
उगा भाउचा ढोल
कर्जामधे अजून किती
बुडणार आहे खोल
धिन तान द धिन तान
दाम्याचा संबळ वाजे
कानामधे त्याच्या आजारी
पोरट्याचे गाणे गाजे
धाड धाड बडवतो आहे
सुक्या एक हाताने डफडे
डोळ्यापुढे त्याला दिसती
नागड्या पोरांचे कपडे
वेदनांचा घालून पिळ
हे ताफ्याचे सूर वाजती
कोणाचा चालला सोहळा
कोणाची दुखे: लाजती
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा