एकटेपणाची चाहूल


मावळून आले जग
आता ध्यास काळोखाचा
अढी टांगल्या कंदीलास
आधार ना कुणाचा ||

सहज वळुनी रात्र
घरात हलकेच शिरते
मिट्ट दाटल्या तिमिरात
वेगळेच हिव भरते ||

दोलायमान मनाची स्थिती
वेध अनामिक शरीराला
अंधार गीताचे बोल
आता ऐकवणार कुणाला ?

चाहुलीने अस्वस्थ घर
भूतासम सावल्या भिरभिरती
दूर चिंचेच्या झाडावर
पाकोळ्या फडफडती ||


संकुचित होती वाटा
दिवे लुकलुकती डोंगरी
घर दाटल्या तिमिरात
खळबळ माजते उरी ||

भयाण वाहे वारा
फ़ांद्यांचे कौलारू टणत्कार
दिवा फ़रफ़रल्या प्रकाशात
नजरी नाचती भयाकार ||

दूर मंदिरातील घंटानाद
मनास देतो समाधान
करकरणा-या दारासवे
भयास येते उधाण ||

निपचित मनाचे कोकरू
आठवू लागते अंगाईस
एकटेपणाची चाहूल
जग वाटे भकास ||

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा