देहाचे अत्तर

शेत झाले मळा
मळा त्याचे घर
राब राब राबे
'बा'चे दोन कर

काळा निळा होय
मायेचा पदर
चुलीचा निखारा
घेत अंगावर

जावे रोज शाळा
दोघांचा जागर
नाही मिळे खाया
कुणाबी भाकर

संस्कार हे असे
त्याचे आम्हांवर
म्हणे 'पाय गट्ट 
रोवा मातीवर'


आणे मग हसू
भूई गालावर
हिरवळ डोले
अश्रू अनावर

मला आकळले
प्रश्नाचे उत्तर
मातीचा गंध
देहाचे अत्तर

कवी:हेमंत उनवणे,नाशिक 

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा