अंधार फार झाला

थोडा उजेड ठेवा अंधार फार झाला
पणती जपून ठेवा  अंधार फार झाला

आले चहु दिशांनी तुफान विस्मृतीचे
नाती जपून ठेवा अंधार फार झाला

काळ्या ढगात वीज आहे पुन्हा टपून
घरटी जपून ठेवा अंधार फार झाला

हे गोठतील श्वास शिशिरातल्या हिमात
ह्रदये जपून ठेवा अंधार फार झाला

वणव्यात वास्तवाच्या होईल राख त्यांची
स्वप्ने जपून ठेवा अंधार फार झाला

हे  वाटतील परके आपुलेच श्वास आता
हातात हात ठेवा अंधार फार झाला

शोधात कस्तुरीच्या आहेत पारधी हे
हरणे जपून ठेवा अंधार फार झाला


बाजार हा फुलांचा येथे फुलेच विकती
कलिका जपून ठेवा अंधार फार झाला

ह्रदयात पाळलेल्या जखमातुनीच आता
कंदील एक लावा अंधार फार झाला

~  हिमांशू कुलकर्णी
(संग्रह " बाभूळवन " मधून  धारा प्रकाशन -औरंगाबाद )

6 comments